Sunday, August 19, 2012

प्रतिभेची झळाळती ज्योत!

मराठी साहित्यविश्‍वाचा खजिना अनेक रत्नांनी समृद्ध आहे. या मातीत अनेक सर्जनशील साहित्यिक जन्माला आले. त्यांच्या अजरामर साहित्याने मराठी रसिकांचे नुसते रंजन केले नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. मने संस्कारित केली. कविवर्य केशवसुतांनी ‘एक तुतारी द्या मज आणुनी’ असे म्हणत आधुनिक मराठी काव्यनिर्मितीची जणू नांदीच गायली. त्यानंतर या मांदियाळीत अनेक प्रतिभावंत कवी-कवयित्री सामील झाल्या. गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बालकवी, बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगूळकर, अनिल, इंदिरा संत अशी कितीतरी नावे घेता येतील. याच झळाळत्या परंपरेत आणखी एक व्यक्तिमत्त्व होतं. आपल्या काव्य आणि गीतलेखनाने त्यांनी मराठी रसिकहृदयात मानाचं स्थान निर्माण केलं. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे कवयित्री शांता ज. शेळके. 

खरं तर शांताबाईंनी कथा, कादंबर्‍या, अनुवाद, ललितलेखन, बालसाहित्य, समीक्षा, स्तंभलेखन अशा सर्वच प्रांतात मुशाफिरी केलीय. पण एक कवियित्री म्हणून त्यांची ओळख मराठी मातीत जास्त रुजलीय. त्यांचं साहित्यही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आनंददायी, शालीन, निर्मळ आणि प्रसन्न आहे. शांताबाई जनार्दन शेळके असे पूर्ण नाव असलेल्या या व्यक्तिमत्वाचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. त्यांचं बालपण पुणे जिल्ह्यातीलच आमच्या खेड, मंचर परिसरात गेलं. शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयतात झालं. प्र. के. अत्रे, श्री. म. माटे, रा. श्री. जोग या दिग्गजांमुळे साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. अत्रे साहेबांच्या ‘दैनिक मराठा’, ‘साप्ताहिक नवयुग’मध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काही काळ काम केलं. त्यानंतर शांताबाईंनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज, मुंबईच्या रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात प्रदीर्घ काळ मराठीचं अध्यापनकार्य केलं.

शांताबाईनी विपुल लेखन केलंय. वेगवेगळे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. ग. दि. माडगुळकर यांच्याप्रमाणेच त्यांनी भावगर्भ आणि अत्युत्तम भावगीते लिहिली. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटगीते त्यांनी लिहिलीत. सेन्सॉर बोर्डच्या सदस्य असताना शांताबाईंनी ‘डॉ. वसंत अवसरे’  या टोपणनावानंही काही काळ गीतलेखन केलं. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘जे वेड मजला लागले’, ‘मागे उभा मंगेश’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा’, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘गणराज रंगी नाचतो’ अशा त्यांच्या किती तरी भावमधुर गीतांनी रसिकहृदयात अढळ स्थान मिळवलंय. व्यासंग, अफाट स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि वक्तृत्त्व ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होत. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्त्व होतं. संतकवी, लोकगीते, संस्कृत सुभाषितांपासून आधुनिक काव्यापर्यंत आवडलेल्या सर्व कविता त्यांना तोंडपाठ असत. अत्रे साहेबांबरोबर काम केलं असल्यानं सोप्या आणि ओघवत्या भाषेत लेखन करण्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे त्यांचं लेखन आपल्या मनाची पकड घेतं. 


विनोदी लेखन आणि नाट्यलेखन सोडून शांताबाईंनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळलेत. ‘वर्षा’ , ‘रुपसी’, ‘गोंदण’, ‘अनोळख’, ‘जन्मजान्हवी’, ‘तोच चंद्रमा’, ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘इत्यर्थ’, ‘श्रावणशिरवा’, ‘पूर्वसंध्या’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय ‘आनंदाचे झाड’, ‘पावसाआधीचा पाऊस’, ‘संस्मरणे’, ‘धूळपाटी’ या पुस्तकांतून त्यांनी ललितलेखनही कवितालेखनाइतक्याच सहजतेनं केलंय.  ‘वडीलधारी माणसं’ हा व्यक्तिचित्रसंग्रह त्यांनी लिहिलाय. ‘धूळपाटी’ या आत्मचरित्रपर पुस्तकाद्वारे त्यांनी आत्मशोध घेतलाय. ‘अनुबंध’, ‘काचकमळ’, ‘कावेरी’, ‘जहाज’, ‘प्रेमिक’, ‘मुक्ता’, ‘सवाष्ण’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. याबरोबरच ‘ओढ’, ‘धर्म’, ‘पुनर्जन्म’, ‘चिखलदर्‍याचा मांत्रिक’, ‘नरराक्षस’, ‘भीषण छाया’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘विझती ज्योत’ यासारख्या कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्यात. त्यांनी प्रभावी बालसाहित्यही लिहिलंय. 

सर्जनशील साहित्यलेखनासह शांताबाईंनी अनुवाद, संकलन, संपादन, समीक्षालेखनही केलंय. जपानी हायकूंचा अनुवाद त्यांनी ‘पाण्यावरल्या पाकळ्या’मध्ये केलाय. कालिदासाच्या ‘मेघदूत’चाही त्यांनी अनुवाद केलाय. लुईसा अलकॉट यांच्या ‘लिटिल वुमन’ या कादंबरीचा त्यांनी केलेला ‘चारचौघी’ हा अनुवाद विशेष गाजला. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कथा व गीतांचे संपादन केलंय. मराठीतील प्रेमकवितांचे आणि ग. दि. माडगुळकरांच्या गीतांचे संकलनही केलंय. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे यांच्या ‘रसिक हो’ आणि ‘श्रोते हो’ या भाषणांच्या पुस्तकांचे संपादन केलंय. डॉ. सरोजिनी बाबर यांच्यासह त्यांनी अनेक वषेर्‌र लोकसाहित्य समितीचं काम केलं. आळंदी येथे १९९६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. चिमणचारा, गोंदण या त्यांच्या पुस्तकांना शासकीय पुरस्कार लाभला. काव्यलेखनासाठी गदिमा गीतलेखन पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. ‘मागे उभा मंगेश’ या गीतासाठी त्यांना सूरसिंगार पुरस्कार, भुजंग या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. 

शांताबाईंनी साधेपणा आयुष्यभर जपला. पण त्यांचं साहित्य सामान्य नसून, असामान्य प्रतिभेचा अविष्कार त्यात दिसतो. अखंडपणे मराठी साहित्यसेवा करणारी अशी ही सर्जनशील ज्येष्ठ कवयित्री ६ जून २००२ रोजी स्वर्गस्थ झाली. त्यांच्यानंतरही त्या आपल्या साहित्यातून त्या अजरामरच राहणार आहेत, याची जाणीव त्यांनाही होती. म्हणून तर त्यांनी पुढच्या ओळीत आपल्या या भावना नेमकेपणानं शब्दबद्ध केल्या आहेत.

असेन मी नसेन मी
तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या
उद्या हसेल गीत हे....

...त्यांच्या स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन!
----------------------------------------------------------------




Saturday, August 4, 2012



शिक्षणाचा अधिकार कायद्याविषयी... 

 मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (राईट टू एज्युकेशन) कायदा मंजूर झाला. ही भारतातील मुलांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. भारतीय इतिहासात प्रथमच सरकारद्वारे कुटुंबे आणि लोकसमुदाय यांच्या मदतीने मुलांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या हक्काची हमी दिली जात आहे. भारताच्या मूळ संविधानात शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांच्या यादीत आलेला नाही. पण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला होता. संविधानाच्या निर्मितीनंतर दहा वर्षांच्या आत शासन मोफत व सक्तीच्या शिक्षणास मूलभूत अधिकाराचा दर्जा देईल, अशी संविधानकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर तब्बल दहा दशकानंतर केंद्र सरकारने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला.  त्यामुळे सहा ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळणार आहे. याठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे, की बालकांसाठी मोफत शिक्षण आहे आणि त्यांना शिक्षण देण्याची बालकांवर सक्ती, असे अभिप्रेत आहे. याशिवाय सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीही मार्गदर्शक तत्त्वांद्वारे शासनावर आली आहे. महात्मा गांधीजींनीही १९३७ मध्येच अशा शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.  


मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी  घेऊ शकणार्‍या आयसीएसई, सीबीएसई, इंटरनॅशनल स्कूल, प्रायोगिक शाळा किंवा खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घेणार्‍या पालकांवर या कायद्याद्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करायचा किंवा नाही, याचा पर्याय आहे. हा कायदा खरे तर वंचितांसाठी आहे. ज्यांना शिक्षण घेता येत नाही, ज्यांच्यापर्यंत शिक्षण अजून पोहोचू शकले नाही, अशांसाठी हा कायदा आहे. आदिवासींसाठी, भटक्या-विमुक्तांसाठी, स्थलांतर करणार्‍या ऊसतोडणी अथवा बांधकाम मजुरांसाठी, अपंगांसाठी, बालकामगारांसाठी आणि आर्थिक-सामाजिक विषमतेचे बळी ठरलेल्या लाखोंसाठी हा कायदा आहे. 

या कायद्यात अनेक चांगल्या तरतुदी आहेत. उदाहरणार्थ ः मोफत प्राथमिक शिक्षण, मुलांचा शारीरिक अथवान मानसिक छळ करण्यास शाळांना मज्जाव, शिक्षण देण्याची शासनावर सक्ती, शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात येण्याची संधी मिळणार, ठराविक परिसरात शाळेची उपलब्धता, जन्मदाखला नसल्याच्या कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही, शाळांना कॅपिटेशन, डोनेशन घेता येणार नाही, वर्षभरात कधीही शाळेत दाखल होण्याची संधी, पालकांचा सहभाग असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निर्मिती तसेच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण, शिवाय या मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार नाहीत. या मुलांना शाळेतून काढूनन टाकता येणार नाही. तसेच शिक्षकांना जनगणना, निवडणुका व आपत्ती मदतकार्याव्यतिरिक्त इतर कामे दिली जाणार नाहीत. अशा अनेक चांगल्या तरतुदी या कायद्यात आहेत. शिक्षणाचा हा हक्क मुलांना मिळवून देणे ही केंद्र व राज्य सरकारची कायदेशीर जबाबदारी राहील.  


प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण (इयत्ता आठवीपर्यंतचे) पूर्ण करावे लागेल या तरतुदीचा अर्थ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास केले जाऊ नये, एवढा मर्यादित अर्थ काढण्यात आला आहे. मूल्यमापनाच्या आधारे एका एखाद्या विषयात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यावर त्या विषयासाठी अधिक मेहनत घेतली जाणे व सर्व विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यास आवश्यक शैक्षणिक  क्षमता प्राप्त करतील, असा या तरतुदींचा खरा अर्थ आहे. कायदा आणि ठराव केल्यामुळे मुले शाळेत जातील, असे मुळीच नाही. मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, की नाही हे महत्त्वाचे नाही तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून किती मुलांना शिक्षण  देऊ शकतो अन् खर्‍या गरजू मुलांना या कायद्याचा लाभ मिळणार की नाही, हा खरा मुद्दा आहे. 



Friday, November 26, 2010

आता काहीच खरे नाही!

आता काहीच खरे नाही!

जगतो आपण जे जगणे
ते जगणे खरे नाही
ज्याला आपण म्हणतो मृत्यू
तं मरणे खरे नाही

मुखवट्यामागे इथे मुखवटे
हे चेहरे खरे नाही
चौकटीतही इथे चौकटी
असे रहाणे खरे नाही

रंगांच्याही वेगळ्या ओळखी
असे रंगणे खरे नाही
माणसांचीही वेगळी ओळख
...आता काहीच खरे नाही!
...आता काहीच खरे नाही!


-अभय न. जोशी
9881141244